नवी दिल्ली । स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मुलींच्या भवितव्याविषयी एक अतिशय महत्त्वाचा असा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लग्नासाठी मुलींचंही वय आता १८ वरून वाढवून २१ केलं जाऊ शकण्याचे संकेत दिले आहेत. मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर (Minimum age of girls for marriage) पुनर्विचार करण्यासाठी एक समिती केंद्र सरकारकडून गठीत करण्यात आलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्य दिनाला यावेळी म्हटलं. समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर याबद्दल योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुलींचं विवाहाचं वय वाढवण्यामागचा मुख्य उद्देश मातृ मृत्यूदर (maternal mortality) कमी करण्याचा आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानंही यासंदर्भात केंद्राला निर्देश दिले होते. याशिवाय महिलेला आई बनण्याच्या योग्य वयाबद्दल सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स बनवण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं होतं. अर्थ मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टास्क फोर्सच्या रिपोर्टनंतर मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलण्याचे संकेत दिले आहेत.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयानं काळजी व्यक्त करताना, मुलींवर होणारे वैवाहिक बलात्कार (marital rape) रोखण्यासाठी बाल विवाहावर संपूर्णत: रोखणं आवश्यक असल्याची गरज व्यक्त केली होती. विवाहासाठी किमान वयोमर्यादेचा निर्णय घेण्याचं काम सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारवर सोडलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या या संदर्भातील निर्देशानंतर सरकारनं यासंबंधी प्रयत्न सुरू केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी यांच्या विवाहाची वयोमर्यादा एक समान असेल आणि मुलीला आई बनण्याची कायदेशीर मर्यादा २१ वर्ष निश्चित करण्यात आली तर महिलांची मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेतील वर्ष आपोआपच कमी होऊ शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”