मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडलं कंबरडं; आधी निर्यात बंदी आणि आता…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रातील मोदी सरकारने सप्टेंबर महिन्यात कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर बंदी लादून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष असताना आता कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना भारतात कांदा आयात करण्यासाठी केंद्रानं आमंत्रण दिलं आहे. जे देश कांदा उत्पादक आहेत तिथून भारतातल्या आयातीसाठी त्या-त्या दूतावासांना विशेष आदेश मोदी सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच आयातीवरच्या कांद्याला लागणारी इन्स्पेक्शन फी देखील माफ करण्यात आली आहे. दुसऱ्या देशातून आयातीला परवानगी दिल्यामुळे स्वाभाविकच भाव पडण्याची शक्यता आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आणखी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

सध्या कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांद्याचा घाऊक भाव 90 रुपयांच्या घरात गेला आहे. तर लवकरच कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे. आता कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. हे सगळं कांद्याला ४ महिन्यांपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून बदलल्यानंतर सुरू आहे. गेल्या १० दिवसात कांद्याचे भाव १२ रुपयांवरून 50 रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचा मोदी सरकारचा दावा आहे.

मात्र, आता दुसऱ्या देशातून आयातीला परवानगी दिल्यामुळे कांद्याचे भाव पडण्याची शक्यता आहे. मग कांदा जीवनावश्यक यादीतून वगळून मोदी सरकारनं नेमकं काय साध्य केलं? असा सवाल केला जातोय. भाव वाढले की आधी निर्यात बंदी केली. त्यातूनही भाव वाढले तर आयातीला परवानगी दिली. यामुळं इथल्या शेतकऱ्याच्या कांद्याचं करायचं तरी काय? असा सवाल शेतकरी करत आहेत.

महाराष्ट्राच्या द्वेषाने केंद्राला पछाडलं- राजू शेट्टी
या निर्णयासंदर्भात एबीपी माझा डिजिटलला प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना मारण्याचं धोरण सरकारचं आहे. एका बाजूला कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांसाठी हा दुर्दैवी निर्णय आहे. दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये कांदा निर्यातीला परवागनी दिल्याची माहिती आहे. आता पुन्हा परदेशातून कांदा आयातीच्या हालचाली सुरु केल्यात. हे तर दलालांना पोसायचे धंदे आहेत. देशात कांद्याची आवश्यकता होती तर कर्नाटकचा, बेंगलोरचा कांदा निर्यातीला परवागनी का दिली? नाशिकच्या कांद्याला निर्यातीला बंदी घातली, असं शेट्टी म्हणाले. महाराष्ट्राच्या द्वेषाने केंद्राला पछाडलं आहे. कांदा म्हणजे महाराष्ट्र हे सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडून आलेले पंतप्रधान आहेत का दलाल आहेत, हेच कळत नाहीये, अशी खरपूस टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment