मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळणार; INDIA आघाडीतील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार (Modi Government) ऑगस्ट महिन्यात कोसळणार असून निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राष्ट्रीय जनता दलचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. शुक्रवारी (05 जुलै) आरजेडीचा 28 वा स्थापना दिवस पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संभोधित करताना लालू यांनी मोदी सरकार कोसळल्याची भविष्यवाणी केली. लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या दाव्यानंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लालूप्रसाद यादव म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार अत्यंत कमकुवत असून ऑगस्टमध्ये पडणार आहे. त्यामुळे निवडणुका कधीही होऊ शकतात. यासाठी तयारीला लागा. डिसेंबर २०२४ किंवा २०२५ मध्ये जेव्हाही विधानसभा निवडणुका होतील तेव्हा बिहारमध्ये आणि देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल असेही त्यांनी म्हंटल. लालू यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांनीही आपल्या पित्याची री ओढली. केंद्र सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही. आम्ही लोकसभेत चांगली लढत दिली. जर आम्हाला आणखी काही जागा मिळाल्या असत्या तर पंतप्रधान सत्तेत राहिले नसते असं तेजस्वी यांनी म्हंटल.

भाजपचा लालूंवर हल्लाबोल –

दरम्यान, लालूंप्रसाद यादव यांच्या सरकार कोसळण्याच्या भविष्यवाणीवरून भाजपने मात्र हल्लाबोल केला आहे. लालू यादव आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. त्याला पडलेले स्वप्न खूप त्रासदायक आहे. लालूप्रसाद यादव बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतमातेच्या मुलांचे आशीर्वाद लाभले असून, तिसऱ्यांदा भारताची विश्वगुरूच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे घाबरले आहेत असं म्हणत भाजप नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी लालू यांच्यावर निशाणा साधला आहे.