बीड प्रतिनिधी | भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यात तीन सभा घेत आहेत. यातील पहिली सभा परळी वैजनाथ येथे पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्यातील महायुतीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. वैजनाथ देवस्थान, गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करून पंतप्रधान मोदी पंकजा मुंडें सहित व्यासपीठावर आले होते.
जम्मू काश्मीरमधल्या सैनिकाने आपल्याला फोन करून मोदींचं कलम ३७० च्या धाडसी निर्णयाचं अभिनंदन करण्याची विनंती केल्याचं पंकजा मुंडे यांनी भाषणाच्या सुरुवातीला नमूद केलं. बीडमधील दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्रातूनही भरीव निधी मिळत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
भारत माता की जय, जय शिवशंभोचा नारा देत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. या वर्षी मला एकाच वेळी २ देवांचं दर्शन घ्यायला मिळालं असल्याचं सांगत जनतेला ईश्वराच्या ठिकाणी मानत असल्याचं मोदी म्हणाले. पाणी प्रश्नावर आपण खूप काही केलं असल्याचं मोदी म्हणाले. जलसिंचन, शुद्ध पाण्याची व्यवस्था या गोष्टी सर्व नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न राहील असंही मोदींनी स्पष्ट केलं. पाणी ही देशापुढील येत्या काळातील महत्त्वाची संपत्ती असल्याचं सांगत सर्वांनीच सरकारच्या जलसंधारणाच्या योजनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे हा पुनरुच्चारही मोदींनी केला. बँकिंग व्यवस्थेत केलेल्या मूलभूत सुधारणा यावेळी मोदींनी बोलून दाखवल्या. शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होत असून शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनाच भाजपला राज्यात पुन्हा सत्तेवर आणतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
काश्मीरचा प्रश्न सोडवल्यानंतर अनेकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे सरकारवर टीका केली होती, त्या सगळ्यांची तोंडं आज बंद झाली असल्याचं मोदी म्हणाले. यंदा बीड जिल्ह्यात महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त झालं पाहिजे असं वचन मोदींनी महिलांकडून घेतलं. याचा एकूणच रोख पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे लढतीकडे असल्याचं पहायला मिळालं. ‘पुन्हा आणूया आपले सरकारचा’ नाराही यावेळी मोदींनी लोकांकडून वदवून घेतला.