मागील जन्मात नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज होते; भाजप नेत्याचा अजब दावा

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या घडीला महाराष्ट्रमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांभोवती सर्व राजकारण फिरत आहे. मागील काही महिन्यांपासून या महापुरुषांच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. आता अशा परिस्थितीतच भाजपच्या एका खासदाराने वाद पेटेल असा अजब दावा केला आहे. त्यांनी मागील जन्मात नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) होते, असे म्हटले आहे.

भाजप खासदार सत्यनारायण जटिया यांनी ओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. हा दावा करताना त्यांनी ओडिशातील गिरीजाबाबा या संताच्या कथित भविष्यवाणीकडे बोट दाखवले. त्यांच्या मते, या संतानेच त्यांना ही माहिती दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच, विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या महानतेचा अपमान ठरवत भाजपवर टीका केली आहे.

दरम्यान, खासदार जटिया यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. “शिवरायांचा वारंवार अपमान होत असून, तो आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाचे म्हणजे, मागील काही आठवड्यांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या घडामोडींमध्ये विरोधकांचा आरोप आहे की, भाजप नियोजनबद्ध पद्धतीने महापुरुषांच्या इतिहासाचा विपर्यास करून समाजात तेढ निर्माण करत आहे. इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचा वापर हा देशाला एकत्र आणण्यासाठी व्हायला हवा, परंतु त्याऐवजी ते राजकीय हेतूसाठी वापरले जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

भाजप खासदार सत्यनारायण जटिया यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना करत केलेल्या वक्तव्यावर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिवप्रेमींसह अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी याविरोधात आवाज उठवला आहे. तसेच, जटिया यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा द्यावा आणि माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप जटिया यांनी आपल्या वक्तव्याबाबत कोणतीही माफी मागितलेली नाही.