हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे येत्या सप्टेंबरमध्ये निवृत्त होणार असून त्यांचा नवा वारसदार हा महाराष्ट्रातील कोणीतरी असेल असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मोदींनी काल नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर राऊतांनी हे विधान केलं आहे. मोदींचा वारसदार संघ ठरवेल असं संजय राऊत यांनी म्हंटल, ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. नरेंद्र मोदी यांनी 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये असं धोरण जाहीर केलं होतं. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना त्यांच्या भूमिकेची आठवण करुन देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये निवृत्त होत असल्याचा अर्ज लिहिण्यासाठी ते बहुतेक संघाच्या मुख्यालयात गेले होते. आता मी जात आहे हे मोहन भागवतांना सांगण्यासाठी मोदी संघाच्या कार्यालयात गेले होते असा बॉम्ब राऊतांनी फोडला. संघाची चर्चा बंद दाराआड असते. ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत. संघ ठरवेल पुढला नेता, तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल, असं संजय राऊत यांनी म्हंटल.
राऊत पुढे म्हणाले, मोहन भागवत आणि संपूर्ण संघ कुटुंब देशाच्या नेतृत्वात बदल अपेक्षित करत आहे. मोदींची वेळ संपली असून देशात बदल अपेक्षित करत आहे. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्षही आपल्या स्वेच्छेने निवडण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा आहे. मोदींचा वारसदार सुद्धा संघ ठरवेल असं दिसत आहे आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिली.
संजय राऊत यांच्या या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मोदींच्या निवृत्तीची चर्चा फेटाळून लावली. मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार करायचाही नसतो. त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.




