गडचिरोली प्रतिनिधी | भामरागड तालुक्यातील काही ग्रामसभा पहिल्यांदाच मोहा फुलांची विक्री ठोक व थेट चांगल्या भावात करणार आहेत. या पूर्वी लोक येथील मोहाची फुले फार कमी किमतीत व मीठ, तेल, मासे, इत्यादी वस्तुच्या बदल्यात विकत होते. यात या क्षेत्रातील आदिवासी व इतर समुदायाच्या लोकांची आर्थिक पिळवणूक होत होती.
परिणामी आदिवासी व अन्य परंपरागत वन निवासीवरील ऐतिहासिक अन्याय थांबले नाहीत. म्हणुन आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई व मुंबई अर्थशात्र व सामाजिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ, यांच्या मदतीने ग्रामसभा पेसा व वन अधिकार या कायद्यांची प्रभावी अंमलबजावनी व्हावी व मोहाच्या फुलाबरोबरच इतरही गौण वन उपजांना योग्य भाव मिळावा व आदिवासी व अन्य परंपरागत वननिवासी यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
एकटा ग्रामसभा परायनार येथे दोन टन मोहाची फुले जमा करण्यात आली आहेत. ग्रामसभा पहिल्यांदाच हा प्रयोग करत असल्यामुळे मोठ्या व्यापारयांचा ग्रामसभांना परिचय व्हावा व बाजार पेठ समजून घेण्यासाठी प्रत्येक गावातून दोन प्रतिनिधी मोहाची फुले विकन्यासाठी जाणार आहेत. तसेच या मोहाच्या फुलांची वाहतूक करण्याकामी आदिवासी विकास महामंडळ मदत करणार आहे. ही संपूर्ण प्रक्रियाबद्दल मौजा परायनार येथे आज दिनांक 30 मे रोजी लोकांशी चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने प्रा. नीरज हातेकर, प्राध्यापक, मुंबई अर्थशात्र व सामाजिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ हे उपस्थित होते.