येत्या तीन ते चार दिवसांत मराठवाड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होईल

औरंगाबाद | 15 जून पासून पावसाच्या सिझनला सुरुवात होते. परंतु यंदा जुलै महिना उजाडला तरीही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तापमान वाढत असल्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होऊ लागला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता घेतलेल्या पिकावर डबल पीक घेण्याची म्हणजेच दुबार पीक घेण्याची वेळ आली आहे. आणि काही भागात अजून पावसाने हजेरी न लावल्याने पेरणी बाकी आहे.

यंदा शेतकऱ्यांनी तुरीऐवजी उडदाला पसंती दिली आहे. यावर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने मोठ्या उत्साहाने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती पण, पेरणी नंतर पिकांना पाणी कुठून देणार याची चिंता लागून आहे. पावसाने ठरावीक भागातच हजेरी लावल्याने फक्त काही भागातच पेरण्या झाल्या. उस्मानाबाद च्या काही भागात पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला नसल्याने या भागातील पेरण्या झाल्या नाहीत.
खरीप हंगामातील उसाचे आणि कांद्याच्या लागवडीचे क्षेत्र वगळता खरिपाच्या 6 लाख 75 हजार 170 हेक्टर असून त्यापैकी 5 लाख 44 हजार 426 हेक्टरवर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 80.61 टक्के एवढे आहे.

‘तूर, कापसावर सध्या फारसा परिणाम नसला तरी पोषक वाढीसाठी पावसाची निंतात आवश्यकता आहे. पावसाने खंड दिल्याने जमिनीत ओलावा निर्माण राहावा, यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कोळपणी, खुरपणी करावी. पोटॅशियम नायट्रेट 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेवून पिकावर सात दिवसाच्या अंतराने फवारणी करा, सिंचनाची सोय असेल तेथे ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करा, पाने पिवळे पडत असेल तर, सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून द्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिला.

सध्या तापमानात वाढ असून दोन दिवसांत नांदेडसह काही भागात पावसाची शक्यता असून पचा ते सहा दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होईल, अशी शक्यता ‘एमजीएम’ हवामान विभागाचे संचालक डॉ. श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केली आहे. तापमान वाढल्याने हवेचा दाब कमी होतो, ‘येत्या तीन-चार दिवसांत कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होईल, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पडेल. विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली.

You might also like