शिट्टी वाजली आणि पवारसाहेब आले …..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार यांच्यासोबत समाजवादी कॉंग्रेस पक्षात काम केलेल्या सांगली जिल्ह्यातील कोतवडे गावच्या सुरेश यादव यांनी सांगितलेली गोष्ट . एकदा कर्नाटक सरकारने सीमाभागातील सर्व मराठी शाळात कन्नड विषय सक्तीचा केला होता या झुंडशाहीच्या विरोधात बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात आंदोलन करण्याचा इशारा शरद पवार यांनी दिला.पण त्यांचा हा इशारा मनावर न घेता सरकारने कन्नड सक्ती कायम ठेवली .आणि ६ मे रोजी माणूसच काय पण महाराष्ट्रातून चीटपाखरुही बेळगावात येणार नाही असे प्रतिआव्हान कर्नाटकचे मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांनी दिले. सरकारने सीमाभागात कडेकोट बंदोबस्त लावला. बेळगावकड जाणार प्रत्येक वाहन चेक करून सोडलं जावू लागलं. साहेबांनी तर इशारा दिलेला. आता काय करायचं ? सीमाभागाची माहिती असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील सुरेश यादव व त्याच्या सहकारी लोकांनी जेथून शक्य होईल त्या मार्गाने लोकांना कर्नाटकात असलेल्या मराठीभाषिक गावात पाठवले. ५ मे ला जवळ जवळ २५० कार्यकर्ते बेळगाव परिसरातील वेगवेगळ्या गावात जावून पाहुण्याच्या भूमिकेत राहिले होते. ६ ला सकाळी दहा वाजता ज्या चौकात आंदोलन होणार आहे त्याच्या आसपास जावून थांबायचे आणि शिट्टी वाजली की पळत त्या चौकात यायचे आणि सरकारचा निषेध करायचा असा प्लन ठरला .

या आंदोलनासाठी लोक पोहचले होते पण शरद पवार साहेब ? ते कसे येणार ?त्यांना तर सगळे कर्नाटकी पोलीस ओळखत होते. पण पत्रीसरकारची पाश्वभूमी लाभलेल्या सांगलीतील हुन्नरी कार्यकर्त्यांनी साहेबाना ४ तारखेलाच हरिपूरच्या एका बेळगाव -कोल्हापूर अशी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून शेतकऱ्याच्या वेषात बेळगावात पोहोच केले होते.विशेष म्हणजे हा ट्रक चेक झाला होता.पण कर्नाटक पोलिसांना शेतकरी वेशातले पवार साहेब ओळखले नव्हते. आणि त्यांनी मुक्काम कोठे केला होता.ज्या चौकात आंदोलन होणार होते तिथून एका मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या एका साध्या हॉटेलात .

६ मे ला सकाळी १० वाजता ठरल्याप्रमाणे शिट्टी वाजली. सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्ते त्या चौकाकडे पळत आले.पवार साहेबही आले.आंदोलन पार पडल.पोलिसांनी लाठीमार केला. अटकही झाली आंदोलकांना. पण बेळगावात महाराष्ट्रातील माणूसच काय पाखरुही येवू देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या कर्नाटकच्या सरकारला आंदोलनाची नवी पद्धत या लोकांनी समजावून सांगितली होती .

संपत लक्ष्मण मोरे
९४२२७४२९२५

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment