भोपाळ | मध्यप्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यात आज बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशात 230 तर मिझोराममध्ये 40 जागा आहेत. सध्या मध्यप्रदेशात भाजपचे तर मिझोराममध्ये काँगेसचे राज्य आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची मानण्यात येत आहे.
या दोन्ही राज्यांमधील जाहीर निवडणूक प्रचार सोमवारी समाप्त झाला. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मध्यप्रदेशचे मुख्य़मंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय मंत्री उमा भारती आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर काँगेसच्या वतीने पक्षाध्यक्ष राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांनी प्रचार केला.
बुधवारी सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ होणार असून ते संध्याकाळी 5 पर्यंत चालणार आहे. मध्यप्रदेशात मुख्य लढत भाजप आणि काँगेस यांच्यात तर मिझोराममध्ये ती मिझो नॅशनल फ्रंट आणि काँगेस यांच्यात होणार आहे. या दोन राज्यांसह छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा येथील मतमोजणी 11 डिसेंबरला होणार आहे. राजस्थान आणि छत्तीसगड येथे 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. या महत्वाच्या निवडणुकांच्या निकालांकडे साऱया देशाचे लक्ष लागून राहिले आहे.