हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरची धडक लागून अपघात घडल्याची घटना मध्यप्रदेश येथे घडली आहे. या अपघातात बसने पेट (MP Bus Fire) घेतला आणि १२ प्रवासी जिवंत जळाले. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना रात्री 9 च्या सुमारास घडली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी असूनही अजूनही स्थानिक लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरु आहे.
बसने पेट कसा घेतला? MP Bus Fire
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील गुना येथे प्रवाशांनी भरलेल्या बसला डंपरने जोरदार धडक दिली. ही बस गुनाहून आरोनकडे जात होती. यावेळी बसमध्ये एकूण ३० प्रवासी प्रवास करत होते, परंतु या अपघांतानंतर बस पलटी झाली आणि तिने जागीच पेट (MP Bus Fire) घेतला. बघता बघता संपूर्ण बस भस्मसात झाली. यावेळी तब्बल १२ प्रवासी जिवंत जळाले तर १७ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अनेक मृतदेह संपूर्ण जळाले असून त्यांची ओळख पटवणे अवघड झालं आहे. सदर बस ही सुस्थितीत नव्हती तरीही प्रवासासाठी ती वापरण्यात आली हे सुद्धा अपघातामागील कारण असल्याचे बोललं जात आहे.
या अपघानंतर मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात अकाली मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. तसेच या भीषण परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभं असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिले आहेत. याशिवाय मृतांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.