हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर मात्र मराठा समाज अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे यातच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. आरक्षणाबाबत संभाजी राजे राज्यातील महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन चर्चा करीत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आहे. मात्र आता संभाजीराजे भाजपाला रामराम करत नवा पक्ष स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
संभाजीराजे हे नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन करून, मराठा आरक्षण लढा तीव्र करू शकतात. तसंच मराठा सोडून बहुजन समाजाला एकत्र आणून मराठा आरक्षण लढा नव्याने सुरू करण्याचीही शक्यता आहे. यासाठी सोशल मीडियावर कॅम्पेनही सुरू करण्यात आलं आहे. राजकीय पक्षांशी फारकत घेऊन कोरोना संपल्यावर लढा अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे हे भाजपला रामराम करून शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन पुन्हा खासदार पद मिळवू शकतात.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट
मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, कुंभकोणी यांना भेटलो. कायदेशीर चर्चा झाली. मराठा आरक्षण कसं मिळेल यावर चर्चा झाली. अडचणी आहेत पण मार्ग काढता येईल. दुसरी गोष्ट दुसरे सर्व पक्ष एकत्र कसे येतील यावर चर्चा झाली. याशिवाय शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबतही चर्चा झाली. मला वाटतंय ज्या आशेने मी आलोय, त्या दिशेने सर्व सुरु आहे. मी पाच वाजताच्या पत्रकार परिषदेत अधिक भूमिका मांडेन”, असं छत्रपती संभाजीराजे यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत जवळपस 45 मिनिटे बैठक झाली.
दरम्यान दुपारी 5 वाजता संभाजी राजे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. संभाजीराजे उद्या प्रकाश आंबडेकर यांचीही भेट घेणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संभाजी राजे यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी संभाजीराजेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.