मुंबई । आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून मराठा सामाज्याच्या विकासाठी या संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं केली जात आहे. याच पार्श्वभूमीवरही बैठक बोलावण्यात आली होती. सारथी संस्थेच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आलं होतं. त्यावरून उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या समन्वयकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला आणि सभेमध्ये गोंधळ झाला. यादरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी सामंजस्याची भूमिका घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. अशातच या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत बैठकीतील गोंधळ मिटवला. या गोंधळावर छत्रपती संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
बैठक संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून भूमिका मांडली. “माझ्या मान अपमानापेक्षा समाजाचं काम मार्गी लागलं हे महत्त्वाचं! छत्रपती घराण्याचे संस्कारच आहे की, आपण रयतेचे सेवक आहोत. स्वतःपेक्षा रयतेला महत्व देणारे उज्ज्वल विचार असलेले माझे घराणे आहे. त्यामुळे समाज हित हीच माझी प्राथमिकता आहे. छत्रपती घरण्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या शिवभक्तांना मी सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल. समाजाने जो सारथीचा लढा उभा केला होता, मराठा समाजाच्या ज्या मागण्या होत्या, त्याच्या पूर्णतेची सकारात्मक सुरुवात झाली हे जास्त महत्वाचे. आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्यावर प्रेम व्यक्त केलं, ते पाहून मला समाधान वाटलं. तुम्हा सर्वांचं छत्रपती घरण्यावर असलेला हा विश्वास मी जपण्याचा प्रयत्न करेन. संभाजी छत्रपती,” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
सारथीची सूत्र अजित पवार यांच्या हाती
अजित पवार यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सारथीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. राजकीय वादाचा विषय ठरलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: पाहणार आहेत. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. “सारथी संस्था बंद होणार नाही. मागील काही काळात गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनामध्ये चुकीचा मेसेज गेला होता. मात्र, हे होणार नाही. सारथी संस्था नियोजन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर सारथीला उद्याच विजय वडेट्टीवार हे ८ कोटी रुपयांची मदत देतील,” असं अजित पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”