कराड | कराड व पाटण तालुक्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी व मदतनीस सेविका यांचा कृष्णकमल ज्वेलर्स यांच्यावतीने कोविड-19 योध्दा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी सत्कारमूर्तींना विशेष भेट देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, तहसीलदार विजय पवार, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. धर्माधिकारी, काँग्रेसचे प्रदेश कमिटीचे सचिव प्रदीप जाधव, यशवंत बँकेच्या एमडी वैशाली मोकाशी, कृष्णकमल ज्वेलर्स मालक बाबूराव पवार, स्वाती पवार, पत्रकार सतिश मोरे, प्रमोद सुकरे, विजय पाटील, प्रदिप राऊत, विकास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वयंसेविका यांनी फार मोठे आणि प्रामाणिक काम केले. विधानसभेत यांच्या मानधनाचा प्रश्न मांडण्यासाठी मी आमदारांना सांगेन. बाबूराव पवार यांनी व्यवसाय करण्यासोबत सामाजिक बांधिलकी जपली. कृष्णकमल ज्वेलर्सने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवून सेविका, मदतनीस यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.
तहसीलदार विजय पवार म्हणाले, कोरोना काळात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस यांनी मानवतेचे काम केले आहे. तुमच्या या कार्याचे कौतुक कृष्णकमल ज्वेलर्स व त्यांचे मालक यांचे कौतुक केले पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. दिपक तडाखे यांनी केले. आभार व्यवस्थापक संदिप यादव यांनी मानले.