औरंगाबाद – आधी कोरोना प्रादुर्भाव आणि आता अतिवृष्टी यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा गंभीर परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यावर शाश्वत उपाययोजना म्हणून खासदार इम्तियाज जलील यांनी ‘मिशन तालीम’ हा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
या मिशन तालीम अंतर्गत सर्व प्रकारचे शैक्षणिक, शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके औरंगाबाद जिल्ह्यातील मदत करू इच्छिणाऱ्यांकडून संकलित करून ते गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये खासदार जलील यांनी 300 विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील सर्व नवीन शैक्षणिक पुस्तके तसेच त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडील उपलब्ध असलेली शैक्षणिक व स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त पुस्तके देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो यशस्वी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.