विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी मिशी ठेवणे कॉन्स्टेबलच्या आले अंगलट, डिपार्टमेंटने केली ‘ही’ कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या हटक्या स्टाईलमुळे सतत चर्चेत असतात. मात्र आपल्या ह्याच हटके स्टाइलमुळे एका पोलीस कॉन्स्टेबलला महागात पडले आहे. मध्यप्रदेश पोलिसात चालक म्हणून तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलवर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारख्या मिशा ठेवल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

या पोलीस कॉन्स्टेबलला त्याच्या मिशां कापण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु त्याने आपली मनमानी दर्शवत मिशा कापण्यास नकार दिला. यानंतर त्याच्या या मनमानीवर कारवाई करत त्याचा डिपार्टमेंटने त्याला निलंबित केले. राकेश राणा असे या कॉन्स्टेबलचे नाव असून ते भोपाळमधील विशेष पोलीस महासंचालक सहकारी फसवणूक आणि सार्वजनिक सेवा हमी यांच्या वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. मतदान तपासणीदरम्यान कॉन्स्टेबल राकेश राणा यांचे केस वाढले असून मिशाही लांब असल्याचे आढळून आले.

यानंतर कॉन्स्टेबल राकेश राणा यांना केस आणि मिशा व्यवस्थित कापण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र त्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करत मिशा आणि केस आहे तसेच ठेवले. अशा स्थितीत युनिफॉर्मवर असताना आदेशाचं पालन न केल्याने ही अनुशासनहीनता मानण्यात आली आणि त्या आधारावर कॉन्स्टेबल राकेश राणा यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.