पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाजपाचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी घणाघाती टीका केली आहे. काल गोपीनाथगडावर पंकजा मुंडे यांनी केलेल्या भाषणावर काकडे यांनी आपली तिखट प्रतिक्रिया माध्यमामध्ये नोंदवली आहे. काल गोपीनाथगडावर पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं म्हणत खासदार काकडेंनी पंकजा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

आपल्या प्रतिक्रियेत काकडे यांनी पंकजा यांना लक्ष करत त्यांना खडे बोल सुनावले. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यशैलीचा दाखल देत त्यांनी पंकजा यांना चांगलेच फैलावर घेतलं. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी राज्यसभेवर निवडून आलो त्यांनी सर्वांना सांभाळलं होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी सर्व समाजातील लोकांकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं असल्याचेही काकडे यांनी म्हटलं.

त्याचबरोबर आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्या एखाद्या नेत्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या फोडणं योग्य नाही. जनतेशी जर नाळ जुडलेली असेल तर कधीच पराभवाला सामोरे जावं लागत नाही. माझ्यासह अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी जवळ केलं नाही. जातीपातीचं राजकारण स्थानिक पातळीवर केल्यामुळे व दुर्लक्षामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. पक्षावर दबाब टाकून स्वतःच्या पदरात काही, तरी मिळवण्याची नेहमीचीच सवय आहे. खरतर माझा सहकारी पडावा असं कोणत्याही मुख्यमंत्र्यांना वाटत नसतं. हा केवळ स्वतःचा पराभव दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रकार असल्याची टीका काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.

कालच्या गोपीनाथ गडावरील भाषणावेळी, कोणताही पक्ष एका व्यक्तीच्या मालकीचा नसतो, माझ्या वडिलांनी आयुष्य झिजवून पक्ष सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविल्याने हा पक्ष माझ्या बापाचा आहे. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचे असेल, तर निर्णय घ्यावा,असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. स्थानिक पातळीवर जातीपातीच राजकारण केल्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याचे म्हटलं होत. या वक्तव्याचा समाचार घेत काकडे यांनी पंकजा यांना आपल्या टीकेतून लक्ष केलं आहे.