सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यामध्ये मे 2023 मध्ये जिवितहानी झालेल्या अपघातांची संख्या 30% नी तर प्रत्यक्ष जिवितहानी 34% नी कमी झाली आहे. याचे कौतुक करुन उपप्रादेशिक परिवहन विभागाने विविध विभागांच्या मदतीने अपघातांचे प्रमाण अजून कमी करण्यासासाठी विविध उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, कराडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्यासह शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, महामार्गावर अवजड वाहनांना जाण्यासाठी स्वतंत्र लेन तयार केली आहे. त्याच लेनमधून अवजड वाहने जातात का नाहीत याची तपासणी करावी. महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर विविध उपाययोजना करा. सातारा ते- शेंद्रे व शेंद्रे ते कागल या महामार्गावरील आणखीन ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी महसूल, राष्ट्रीय महामार्ग, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांची संयुक्त पथके तयार करा. ब्लॅक स्पॉटवर अपघात होणार नाहीत यासाठी विविध उपायोजना करा. जिल्ह्यातील रस्यां्हवरील बांधण्यात आलेल्या पुल ओलंडल्यानंतरच्या रस्यां्गवर काही ठिकाणी डांबरीकरण केलेले नाही तरी लवकरात लवकर डांबरीकरण करुन घ्यावे अशा सूचनाही श्री. पाटील यांनी केल्या.
महामार्गावरील मोठ्या पुलांखाली काही नागरिक वाहन पार्किंग करतात, अशांवर कारवाई करा. सध्या वाहन चालवतांना अनेक जण मोबाईलवर बोलत असतात हे एक अपघाताचे मोठे कारण आहे. याबाबत समाजामध्ये तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये सामाजिक जाणीवेतून जनजागृती करावी. यासाठी पोलीस विभागासह इतर विभागांची मदत घ्यावी. रेल्वेने बांधलेल्या पुलांवर पिवळ्या रंगाची लाईट लावावी. तसेच सदस्यांच्या काही सूचना असतील तर त्या निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे द्याव्यात, असेही आवाहनही खासदार श्री. पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, महामार्गावरील ब्लॅक स्पॉट शोधण्यासाठी आराखडा तयार करा. महामार्गावरील जे बस स्टॅन्ड स्थलांतरीत करावयाचे आहेत त्यांचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा. महामार्गावरील सेवा रस्त्यांच्या ज्या – ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत त्याची यादी तयार करा. प्रवासी वाहतूक करणारे जे वाहन धारक परमिट घेत नाहीत, अशांवर कारवाई करुन ज्या वाहन धारकांचे परमिटसाठी अर्ज येतील त्यांना तात्काळ परमिट उपलब्ध करुन द्यावे. महामार्गावर ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्या ठिकाणी 108 रुग्णवाहिका ठेवण्याबाबत आराखडा तयार करा. अपघातांमध्ये जखमी झाले आहेत त्यांना शासकीय रुग्णालयातच उपचारासाठी घेवून जावे जर खासगी रुग्णालयात नेहल्यास त्याची कारणे लेखी द्यावीत. अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना जिल्हा वार्षिक योजनेमधून करीत असल्यास त्याचे प्रस्ताव द्यावे. तसेच येणाऱ्या तक्रांरीवर एक महिन्याच्या आत निपटारा करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी यावेळी केल्या.