हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा (एमपीएससी) मुख्य परीक्षेच्या सहापैकी चार विषयांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यात मराठी आणि इंग्रजी हे दोन भाषा विषय वगळण्यात आले आहेत. मात्र हा सिलॅबस पूर्णतः बदललेला नसून काही घटकांमध्ये बदल करून सिलॅबस अपडेट करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी या दोन भाषा विषयांसोबत सामान्य अध्ययन-१, सामान्य अध्ययन-२, सामान्य अध्ययन-३, सामान्य अध्ययन-४ हे विषय असतात. भाषेचे विषय १०० गुणांसाठी असतात तर इतर विषय १५० गुणांसाठी असतात. एकूण ८०० गुणांची परीक्षा असते. सुधारित अभ्यासक्रम हा संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून पुढील परीक्षेसाठी असणार आहे. असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच भाषा विषयातील सुधारित अभ्यासक्रम संकेतस्थळावर देण्यात आला असून इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम आणि अधिकृत मानला जाईल असेही नमूद करण्यात आले आहे.
अपडेट केलेल्या अभ्यासक्रमातीलच प्रश्न याआधी विचारण्यात आले होते त्यामुळे बदललेल्या अभ्यासक्रमामुळे फारसा फरक पडणार नाही अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. तर वाट लावणे काय असते हे एमपीएससी कडून शिकावे, या काळात सिलॅबस बदलण्याची काहीच गरज नव्हती अशाही प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.