MPSC ला मायाजाल म्हणत मुख्य परीक्षा पास झालेल्या तरुणाची आत्महत्या; पुण्यात मन हेलवणारी घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं तरुणाने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे.

स्वप्नील लोणकर हा मुळचा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून तो कुटुंबांसह पुण्यात राहत होता. स्वप्नीलचे वडील पुण्यातील शनिवार पेठेत बिल बुक छापण्याचा व्यवसाय करतात तर स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर स्वप्नील एम पी एस सी परीक्षेची तयारी करत होता.

आत्महत्येपूर्वी स्वप्नीलचे पत्र; mpsc ला म्हणाला मायाजाल

MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! अस स्वप्नीलने आपल्या सुसाईड नोट मध्ये लिहिले.

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील. असेही त्याने म्हंटल.