Tuesday, January 7, 2025

धोनीचा जबरा फॅन!! थेट मैदानात घुसला अन ‘थाला’ चे पाय धरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंघ धोनी (MS Dhoni) … सिर्फ नाम ही काफी है !! भारतीय क्रिकेटप्रेमींनी जर सर्वात जास्त प्रेम कोणत्या खेळाडूवर केलं असेल तर तो धोनीच ,…. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून धोनीने निवृत्ती घेऊन अनेक वर्ष झाली तरीही त्याची क्रेझ अजूनही कायम आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) प्रत्येक सामन्यात याची प्रचिती पाहायला मिळते. धोनीला फक्त बघण्यासाठी चाहते मोठया संख्येने स्टेडियमवर येत असतात. काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तर धोनीचा एक चाहता थेट मैदानात घुसला आणि धोनीचे चरणस्पर्श केले.. यावेळी संपूर्ण स्टेडियममध्ये धोनी धोनीचा नारा ऐकायला मिळाला.

काल गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा (GT Vs CSK) संघ अडचणीत असताना धोनी फलंदाजीसाठी आला. धोनी सामन्याच्या शेवटच्या षटकात फलंदाजी करत असताना एक चाहता थेट मैदानात घुसला आणि त्याने माहीचे पाय पकडले. यानंतर धोनीने त्याला मिठी सुद्धा मारली. तेवढ्यात पाठीमागून सुरक्षारक्षक आले आणि त्या धोनीच्या फॅनला घेऊन ते बाहेर गेले. सोशल मीडियावर याबाबतचा विडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात धोनीने चौफेर फटकेबाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केलं. धोनीने ११ चेंडूत २६ धावांची ताबडतोब खेळी केली. यामध्ये त्याने १ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार ठोकले. मात्र गुजरातचे २३२ धावांचे आव्हान चेन्नईला झेपलं नाही.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने २३१ धावांचा डोंगर उभारला. संलामीवर साई सुदर्शन आणि शुभमन गिलने आक्रमक खेळी करत शतके ठोकली. साई सुदर्शनने ५१ चेंडूत १०३ धावा तर शुभमन गिलने ५५ चेंडूत १०४ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईला सुरुवातीलाच ३ जबर धक्के बसले. मात्र डार्लि मिचेल आणि मोईन अलीने संघाचा डाव सावरत जिंकण्याची आशा कायम ठेवली होती. धोनीने सुद्धा अखेरच्या २ षटकात वादळी खेळी केली परंतु तरीही चेन्नईला विजय मिळवता आला नाही.