थकबाकी साठी महावितरणची अनोखी योजना; वीज भरा अन् दुचाकी मिळवा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – जर तुम्ही महावितरणचे वीज बिल आणि थकबाकी नियमित भरत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिक दुचाकी, टीव्ही, मोबाईल, फ्रिज असे अनेक बक्षीस मिळू शकते. विज बिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक महिन्याला वीज बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांसाठी बक्षिस योजना आणली आहे. 1 जुनपासून सुरू झालेल्या या योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

 

नियमित वीजबिल व थकबाकी भरण्यासाठी महावितरण नागरिकांना वारंवार आवाहन करते. परंतु, अनेक ग्राहक वेळेवर बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. अनेकदा अशा ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई महावितरणला करावा लागतो. विज बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना पुढील तसेच विलंब शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळावा, घरगुती ग्राहकांनी वीज बिल भरण्यास स्वतःहून पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल‌ भरण्याची सवय लागावी यासाठी ही बक्षीस योजना महावितरण सुरू केली आहे.

 

प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला सोडत काढण्यात येईल.‌ दर महिन्याला मराठवाड्यातील 101 उपविभागातील 1 हजार रुपयापर्यंतची प्रत्येकी दोन बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल. यासोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एक मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, 9 मंडळातून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅबलेट, 3 परीमंडळातून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस दिले जाणार आहे. प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे दरमहा बंपर बक्षीस आहे.

Leave a Comment