हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC Bus Accidents । महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांचे हक्काचे वाहन.. राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी बस पोचत असल्याने आणि एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास मानला जात असल्याने एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आता याच एसटीचे भयानक वास्तव समोर आलं आहे. मागच्या ३ वर्षात ST अपघातात १,२३४ प्रवाशांचा मृत्यु झाला असून तब्बल ८,५०२ जखमी झाल्याचे समोर आलं आहे. माहिती अधिकारातून हि बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता एसटी सुद्धा जीवघेणी ठरतेय कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहिती अधिकाराच्या उत्तरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मागील ३ वर्षातील एसटी अपघातांची माहिती दिली आहे. यामध्ये असे दिसून आलं कि बस अपघातांमुळे (MSRTC Bus Accidents) होणाऱ्या प्रवाशांच्या मृत्युचे प्रमाण दरवर्षी लक्षणीयरीत्या वाढत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि बस ताफ्यात नवीन एसटी बस दाखल होत असतानाही मागील ३ वर्षांत १.९७ लाख बसेस अजूनही बिघाडल्या असल्याची माहितीही आरटीआयच्या उत्तरात समोर आली.
कोणत्या वर्षी किती अपघात ? MSRTC Bus Accidents
१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत, एमएसआरटीसी बसेसचे ३,०१४ अपघात झाले. यामध्ये ३४३ जणांचा मृत्यू झाला तर २,४५० प्रवासी गंभीर जखमी झाले.
२०२३-२४ मध्ये एकूण ३,३८१ अपघात झाले. या अपघातात ४२१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २,८१८ प्रवासी गंभीर जखमी झाले.
२०२४-२०२५ मध्ये, अपघातांची संख्या ३,५६३ वर पोहोचली. या काळात ४७० प्रवाशांना जीव गमवावा लागला तर ३,२३४ प्रवासी गंभीर जखमी झाले.
मागील ३ वर्षातील अपघाताचे हे आकडे नक्कीच भयानक आहेत. अपघातात (MSRTC Bus Accidents) नुकसान झालेल्या एसटी बसेसच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. २०२२-२०२३ मध्ये, ६४,३३५ एसटी बिघडल्या. २०२३-२४ मध्ये, ६७,०१९ एसटी बस बिघडल्या, तर २०२४-२०२५ मध्ये ही संख्या थोड्याफार प्रमाणात कमी होऊन ६६,५५२ झाली. या आकडेवारी वरून, महामंडळाच्या देखभाल प्रोटोकॉल, ऑपरेशनल देखरेख आणि सुरक्षा मानकांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.