सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील दहिवडी शहरात दहिवडी एसटी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव यांनी आज पहाटे माण नदीपात्रा नजीक असणाऱ्या स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केल्याचा बस चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
दहिवडी येथील स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या शेडला एक व्यक्ती लटकत असल्याचे नागरिकांनी पाहिले. मात्र ती व्यक्ती कोण हे कोणी ओळखू शकले नाही . तेव्हा नागरिकांनी तात्काळ दहिवडी पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी गळफास घेतलेले व्यक्ती काशिनाथ वसव असल्याचे समजले.
पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या खिश्यात एक चिट्ठी पोलिसांना मिळून आली. मात्र या चिठ्ठीत नेमका काय मजकूर आहे. हे अजून समजले नाही. मात्र दहिवडी एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केली असल्याचा आरोप बस चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचा अधिक तपास दहिवडी पोलीस करत आहेत.