हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत दानशूर बंडो गोपाळा मुकदाम तात्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. संस्थेचे अध्यक्षपद, चेअरमनपद भुषवून तात्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी भरीव काम केल्याचे, मत संस्थेचे सहसचिव आर.एस. साळुंखे यांनी व्यक्त केले. कराड तालुक्यातील कुसूर येथे आयोजित मुकादम तात्या यांच्या 122 व्या जयंती सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी साळुंखे पुढे म्हणाले की, मुकादम तात्या यांनी दूरदृष्टी ठेवून कुसूर येथे शाळा, काॅलेज सुरु केले. कराड येथे संत गाडगे महाराज महाविद्यालयाची (S.G.M.) स्थापना केली. तसेच पाटण तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये बहुजनांच्या मुलांकरता शाळा सुरु केल्या.
कुसूर (ता. कराड) येथील श्री सदगुरू गाडगे महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने 42 वा पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला. माजी प्राचार्य रविंद्र येवले, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव (माध्यमिक) आर. एस. साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच मुकादम तात्या यांचे चिरंजीव विलासराव बंडोबा कदम, सुभाषराव कदम, कुसूरचे सरपंच उदयसिंह कदम आदी उपस्थित होते.
पुरस्काराचे वितरण
यंदाचा मुकादम साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील यांनी लिहिलेल्या “ऊसकोंडी” या ग्रंथास देण्यात आला. तसेच ए. डी. आत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार किडगांव येथील भैरवनाथ विद्यालयाचे उपशिक्षक अनिल पवार यांना तर चैतन्य पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे उपशिक्षक अविनाश साळुंखे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्काराचे मानकरी
कुसूर येथील संत गाडगे महाराज विद्यालय व पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघच्यावतीने प्रतिवर्षी मुकादम साहित्य पुरस्काराचे वितरण केले जाते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम असे साहित्य पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी उपराकार लक्ष्मण माने, सिंधुताई सपकाळ, नरेंद्र जाधव, शंकरराव खरात, विश्वास पाटील, डॉ.राजन गवस, डॉ.श्रीपाल सबनीस, उत्तम कांबळे,नागनाथ कोतापल्ले, डॉ. आर. ए. कुंभार व प्राचार्य विजय नलावडे हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.