Mukhyamantri Teerth Darshan Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ‘तीर्थ दर्शन’; 66 स्थळांचा समावेश, काय आहे पात्रता?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. महत्वाची बाब म्हणजे फक्त राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल. आता या योजनेचे शासकीय परिपत्रकही काढण्यात आले असून यामध्ये कोणकोणत्या तीर्थस्थळांचा समावेश आहे? आणि यासाठी पात्रता काय आहे ते आज आपण सविस्तर जाणून घेऊयात….

या तीर्थ दर्शनासाठी रेल्वे, तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे. प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. ही समिती अर्जांची छाननी करून पात्र व्यक्तींची निवड प्रक्रिया पूर्ण करेल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. जास्त अर्ज आल्यास लाभार्थी निवड लॉटरीद्वारे होईल.

पात्रता आणि अटी जाणून घ्या-

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) हि ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांसाठी आहे.
यातील एका तीर्थस्थळाला भेट देण्याचा यात्रेकरूंना अधिकार राहील.
प्रवास खर्चाची प्रतिव्यक्ती मर्यादा ३० हजार कमाल आहे. यामध्ये राहण्याची सोय, जेवण इत्यादी बाबींचा समावेश आहे.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
तुमच्या घरात ट्रॅक्टर वगळून इतर चार चाकी वाहन असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा.

कोणकोणत्या तीर्थस्थळांचा समावेश? Mukhyamantri Teerth Darshan Yojana

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजनेच्या (Mukhyamantri Teerth Darshan Yojana) माध्यमातूम जेष्ठ नागरिक महाराष्ट्रातील ६६ तीर्थस्थळांना भेट देऊ शकतात. यामध्ये विठोबा मंदिर (पंढरपूर), शिखर शिंगणापूर (सातारा), महालक्ष्मी (कोल्हापूर), ज्योतिबा (कोल्हापूर), जैन मंदिर (कोल्हापूर), रेणुका देवी मंदिर (माहूर), गुरुगोविंदसिंग समाधी (नांदेड), खंडोबा मंदिर (मालेगाव), संत नामदेव देवस्थान (उंब्रज, नांदेड), तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर), संत एकनाथ समाधी (पैठण), घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (वेरूळ), जैन स्मारके, वेरूळ लेणी, विघ्नेश्वर (ओझर, नाशिक), संत निवृत्तीनाथ समाधी (नाशिक), त्र्यंबकेश्वर मंदिर, फेरी नाशिक, सप्तशृंगी (वणी), काळाराम मंदिर नाशिक, मांगी-तुंगी जैन मंदिरे (नाशिक), गजपंथ (नाशिक), सिद्धिविनायक मंदिर (नगर), शनी शिंगणापूर, श्रीक्षेत्र भगवानगड (नगर), बल्लाळेश्वर (पाली), गजानन महाराज मंदिर (शेगाव), एकवीरा देवी (कार्ले), दत्त मंदिर (औदुंबर), केदारेश्वर मंदिर (बीड), वैजनाथ मंदिर (परळी), पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर (रत्नागिरी), महाकाली देवी (चंद्रपूर), काळूबाई मंदिर (सातारा), अष्टदशभुज (रामटेक), नागपूर दीक्षाभूमी, चिंतामणी (कळंब), चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ (कॅवेल), सेंट अंड्र्यू चर्च, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, सीप्झ (अंधेरी), गोदीजी पार्श्वनाथ मंदिर, नेसेट एलियाहू, शार हरहमीम सिनेगॉग, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग (भायखळा), सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च (ठाणे), अग्यारी-अग्निमंदिर (ठाणे), मयुरेश्वर मंदिर (मोरगाव), चिंतामणी मंदिर (थेऊर), गिरिजात्मज मंदिर (लेण्याद्री), महागणपती मंदिर (रांजणगाव), खंडोबा मंदिर (जेजुरी), संत ज्ञानेश्वर समाधी (आळंदी), भीमाशंकर ज्योतिर्लिंग (खेड), संत तुकाराम समाधी (देहू), संत चोखामेळा समाधी (पंढरपूर), संत सावतामाळी समाधी (माढा) या तीर्थस्थळांचा समावेश आहे.