मुक्तांगण बंद होईल का ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल | मुक्ता पुणतांबेकर

पु. ल. देशपांडे यांच्या आर्थिक मदतीतून १९८६ साली माझे आई – बाबा डॉ. अनिता अवचट व डॉ. अनिल अवचट यांनी मुक्तांगण ची स्थापना केली. त्यावेळी उद्घाटनाच्या भाषणात पु. ल. म्हणाले होते, ” आज मी एका व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करतोय या केंद्राची भरभराट होऊ दे, अशा शुभेच्छा मी तुम्हाला देणार नाही. त्या चुकीच्या शुभेच्छा होतील. म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की असं काम करा की एक दिवस हे व्यसनमुक्ती केंद्र बंद झालं पाहिजे. तेव्हा आपण इथे एक सांस्कृतिक केंद्र सुरू करू.” किती मोठ्या शुभेच्छा पु. लं. नी दिल्या होत्या. माझ्या आईनेही व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न पाहिलं. ‘मुक्तांगण बंद झालं पाहिजे’ असं ती नेहमी म्हणायची.

मुक्तांगण मधून बरे होऊन जाणाऱ्या मित्रांना आम्ही सांगतो की तुम्हाला मुक्तांगणला काही मदत करायची असेल तर फक्त तुम्ही व्यसनमुक्त रहा. तुमचं उदाहरण बघून इतरही लोकांना व्यसनमुक्तीची प्रेरणा मिळेल आणि मग एक दिवस आपण मुक्तांगण बंद करू. लॉकडाऊन झाल्यावर आम्ही नवीन रुग्णांना दाखल करून घेणं थांबवलं. त्याआधी ॲडमिट झालेल्यांना संसर्ग न होणं महत्वाचं होतं. उपचार पूर्ण झालेल्यांचे हळूहळू डिस्चार्ज होत आहेत. मुक्तांगणमधे एकावेळी २०० – २५० लोक असतात. ते आता फक्त ५०-६० आहेत.

काम कमी असल्यामुळे माझं स्वप्नरंजन सुरू झालं. ‘सध्या लॉकडाऊनमुळे दारू उपलब्ध नाही. आता घरी जाणारे रुग्ण नक्कीच व्यसनमुक्त राहतील. दारुच मिळत नाही म्हटल्यावर लोकांना व्यसन लागणार नाही. म्हणजे मुक्तांगणमधे कोणी येणार नाही.’ पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे आम्ही खरोखरच मुक्तांगण बंद करतोय असंच मला वाटायला लागलं.

पण आज या स्वप्नरंजनातून मी धाडकन बाहेर आले. आजपासून दारूची दुकानं उघडली. लोक रांगा लावून दारू घ्यायला लागले.नंतर नंतर तर धक्काबुक्की सुरू झाली. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. आता मला पुढचं भयानक चित्र दिसतंय. कोरोनाच्या केसेस तर वाढतीलच पण अपघात, कौटुंबिक हिंसाचार हे सर्व किती वाढेल याची मी कल्पनाच करू शकत नाही. आज दुपारी मी मुक्तांगण मधून बाहेर पडून मुख्य रस्त्याला आले तेव्हा समोरच असलेल्या वाईन शॉपच्या गर्दीचा मी काढलेला फोटो या लेखासोबत देत आहे. त्या गर्दीकडे बघताना मुक्तांगण बंद करायचं पु. लं. चं स्वप्न विरून जातांना दिसलं.

मुक्ता पुणतांबेकर
संचालक
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे

Leave a Comment