मुंबई । लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले केले जात असल्याच्या बऱ्याच घटना समोर आल्या असून त्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. असाच एक हल्ल्याची घटना पहाटे मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे घडली. हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला हटकल्याने या माथेफिरू तरुणाने गस्तीवरील दोन पोलिसांवर धारदार कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत. करण प्रदीप नायर असं या माथेफिरूचं नाव आहे. तो ब्रीच कँडीच्या सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहतो. हल्लेखोर माथेफिरुला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके हे आज मध्यरात्री दीड वाजता मरीन ड्राइव्ह येथे नाकाबंदीच्या ड्युटीवर होते. यावेळी त्यांना प्राणसुखलाल मफतलाल हिंदू स्विमींग बाथ अँड बोट क्लब येथे नायर हातात कोयता घेऊन फिरत असल्याचं दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून हटकण्याचा प्रयत्न केला असता नायरने तेथून पळ काढला. त्यामुळे या दोन्ही पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता नायरने त्यांच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात कदम यांच्या खांद्याला तर शेळके यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डिसीपी संग्रामसिंग निशानदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी पोलिसांना तात्काळ जेजे रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी नायरला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. नायर हा कृषी विषयातील पदवीधर आहे. तो मध्यरात्री कोयता घेऊन घराबाहेर का आला होता? याचाही तपास पोलीस करत आहेत. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी या घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांवरील हल्ले खपवून घेणार नाही. कुणाचीही अशी अरेरावी कदापिही खपवून घेतली जाणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असं सांगतानाच मनोधैर्य खचू देऊ नका, असं आवाहन देसाई यांनी पोलिसांना केलं आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”