मुंबई । मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात अवघ्या ६ दिवसांची चिमुरडी मृत्यूला झुंज देत आहे. आरजू अंसारी नावाच्या या चिमुरडीच्या ह्रदयात जन्मतः ३ वॉल ब्लॉक आहेत. या गंभीर आजारावर मात करण्यासाठी तिच्यावर तात्काळ ह्रदय शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे. परंतू आरजूच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. दरम्यान तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी पैसे जुळवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब पोहचताच त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना आर्थिक मदत केली.
मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या ६ दिवसांची मुलगी आरजूच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज असल्याचं निदान लागताच तिच्या वडिलांनी तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. फोर्टिस रुग्णालयात मुलीला दाखल केल्यानंतर तिच्या उपचारासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैसे लागतील हे कळताच त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे मदतीची मागणी केली. परंतु त्यांच्या कठीण प्रसंगी नातेवाईकांनी त्यांची साथ दिली नाही.
अखेर आरजूच्या वडिलांच्या हाकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे धावून आले आहेत. जेव्हा आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर ही पोस्ट वाचली तेव्हा त्यांनी तात्काळ याची दखल घेत आरजूच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली. आदित्य ठाकरेंच्या मदतीनंतर आता आरजूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरजूच्या आई-वडिलांनी आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. दरम्यान, सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”