Mumbai Best : मुंबई राज्याची आर्थिक राजधानी आहे. इथं हजारो लोक नोकरी आणि व्यवसायाच्या शोधात येतात, राहतात आणि मुंबईचे होऊन जातात. लोकल आणि ट्रेन्स नंतर मुंबईत सार्वजनिक दळणवळणाच्या साधनांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावते ती म्हणजे मुंबईची ‘बेस्ट’. मात्र आता मुंबईच्या बेस्ट बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली असून मुंबईच्या बेस्टचं भाडं वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या (Mumbai Best)खिशाला कात्री लागणार आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
बेस्टचा तिकीट दर जवळपास दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात होत असलेला तोटा. कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बेस्टचा दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. त्यानुसार सध्या बसचे भाडे पाच वरून दहा रुपये व वातानुकूलित बसचे तिकीट सहा वरून बारा रुपये प्रस्तावित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस व्ही आर श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि भाडेवाढीसह बसताफा (Mumbai Best)आणि सेवांचा देखील आढावा घेतला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना श्रीनिवास यांनी सांगितलं की, कर्मचाऱ्यांची देणी व तोटा यावर तोडगा काढण्यासाठी भाडेवाडी शिवाय पर्याय नाही. मात्र याबाबत आणखी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. तपा कर्मचाऱ्यांची देणी ही आहेत यासह अन्य खर्चही आहे. त्यामुळे भाडेवाढीचा पर्याय समोर आलाय मात्र याबाबत आत्ताच सांगणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया एस व्ही आर श्रीनिवास यांनी दिली आहे.
मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर काही दिवसांपूर्वी वाढवण्यात आले होते. 1 फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरामध्ये आठ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या नवीन दरानुसार मुंबईमध्ये ऑटो रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले आहे. तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये करण्यात आले आहे. तसेच कुल कॅबच्या भाड्यात वाढ होऊन 40 रुपये 48 रुपये आकारले जाणार आहेत.