Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर 23 ऑगस्टपासून ‘या’ वाहनांना बंदी

Mumbai Goa Highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Highway । गणेशोत्सव अगदी १२- १३ दिवसांवर आला असून मुंबई पुण्यातून कोकणात जाणारे चाकरमानी तयारीला लागले आहेत. मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त काही स्पेशल ट्रेन चालवल्या जात आहेत. तर चारचाकी वाहनधारक किंवा बसने जाणाऱ्या प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गावरून जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावरून गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी महत्वाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त या महामार्गवरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबत माहिती दिली असून चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या वेळेत बंदी ? Mumbai Goa Highway

मुंबई गोवा महामार्गाची अवस्था आधीच वाईट आहे. त्यात गणेशोत्सवाला या महामार्गावर गाड्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी आणि प्रवाशांना आरामात कोकणात जाता यावे यासाठी प्रशासनाने अवजड वाहनांना काही ठराविक कालावधीसाठी बंदी घातली आहे.
त्यानुसार 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत या बंदीचे पालन अवजड वाहन चालकांना पाळावे लागणार आहे.

दरम्यान, गणेश भक्तांसाठी मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी तयारी करण्यात आली आहे. पोलीस मदत केंद्र , टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा प्रवाशांना देण्यात येईल. एवढंच नव्हे तर वैद्यकीय कक्ष, रूग्‍णवाहिका सेवा, बालक आहार कक्ष, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गणेशभक्तांचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत.

अवजड वाहनांना पर्यायी मार्ग कोणते?

अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर बंदी असली तरी, त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या काळात ही अवजड वाहने पुणे-सातारा- कराड- कोल्हापूरमार्गे गोव्याच्या दिशेने प्रवास करू शकतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या घाटातून या वाहनांना कोकणात जावे लागेल.