मुंबई आणि नवी मुंबईमधील अंतर लवकरच एका मेट्रो राइडमध्ये पार करता येणार आहे तेही अवघ्या 30 मिनिटांत. नवी मुंबईतील नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. सिडकोने प्रस्तावित केलेल्या ‘एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रो लाईन 35’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच या मार्गाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एकमेकांशी जोडले जाणार आहेत.
मेट्रो लाईन 8
या प्रकल्पांतर्गत एकूण 35 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाची आखणी करण्यात आली आहे. त्यातील 25.63 किमी हा उन्नत मार्ग असून 9.25 किमीचा भाग भुयारी असणार आहे. मुंबई विमानतळ ते मानखुर्द दरम्यानचा 11.1 किमीचा टप्पा मेट्रो मार्ग क्रमांक 8 अंतर्गत उभारण्यात येणार आहे. यानंतर सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा भाग उभारणार आहे.
वाहतुकीत क्रांती घडवणारा प्रकल्प
या मार्गामुळे दोन्ही विमानतळांमधील प्रवास केवळ अर्ध्या तासात शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी लागणारा वेळ आणि वाहतूक कोंडी ही नागरिकांची मोठी समस्या आहे. हा प्रकल्प या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. मेट्रो मार्गावर एकूण 7 स्थानके प्रस्तावित असून दर 20 ते 30 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
सिडकोचा व्यापक मेट्रो व्हिजन
सिडकोने नवी मुंबईसाठी एकूण 25 मेट्रो मार्ग प्रस्तावित केले आहेत. यातील बेलापूर-पेंधर (11 किमी) मार्गावर नोव्हेंबर 2023 पासून सेवा सुरू झाली आहे. आता हा मार्ग 3.02 किमीने वाढवून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. नवी मुंबईतील विमानतळ पूर्णत्वास गेल्यावर, या मेट्रो मार्गामुळे मुंबईकर आणि नवी मुंबईकर दोघांसाठी प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे. ‘एअरपोर्ट एक्स्प्रेस लाईन’ फक्त मेट्रो नव्हे, तर दोन्ही शहरांना गतिमान जोडणारा एक नवा दुवा ठरणार आहे.




