मुंबई । देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बत्ती गुल झाली. मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. सोमवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली आणि त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापारेषणच्या ४०० किलो कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ची देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात याचा फटका बसला आहे. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसलाय. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.
वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे युद्धपातळीवर सुरु आहेत. सध्या उरणमधील २२० केव्ही ची वहिनी पूर्ववत होतेय तर, पश्चिम क्षेत्र भार नियमन व राज्य भार नियमन केंद्राकडून जोमाने प्रयत्न सुरू आहेत, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकूण ८०० मेगावट वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण झाला असून डहाणू येथील अदानीच्या प्रकल्पातून ३८० ऐवजी ४८० मेगावट वीज पुरवठा सुरू होत आहे. त्यामुळे काही वेळात काही प्रमाणात वीज सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लोकलसेवा ठप्प
मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या हार्बर मार्गावरील काही लोकल पुन्हा सुरू झाल्याचं, समजतंय
विद्यार्थ्यांना फटका
वीज गेल्याने अंतिम वर्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ऑनलाइन लेक्चर्स सुरू असताना अचानक वीज गेल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर, अनेक शाळांच्या परीक्षा सुरू होत्या वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीयेत.
रुग्णालयात उपकरणं बंद पडण्याची शक्यता
मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”