हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Rain Updates । महाराष्ट्राची राजधानी मुंबईला पावसाचे चांगलंच झोडपलं आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहरासह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणीच पाणी बघायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या धोक्यामुळे मुंबई महापालिकेने महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये यांना आज (मंगळवार 19 ऑगस्ट) सुट्टी जाहीर केली आली आहे. तसेच खाजगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत (Mumbai Rain Updates) झाले आहे. रस्त्यावर चहुबाजूनी पाणीच पाणी साचल्याने कामावर जाणाऱ्या मुंबईकरांची अक्षरशः दैना उडाली. शाळेत जाणारी मुले आणि पालकही चिंतेत होते, मात्र मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना तात्काळ शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. खरं तर भारतीय हवामान विभागाने कालच मुंबई व महाराष्ट्रातील अनेक भागांना रेड अलर्ट तर काही भागांना यलो अलर्ट जारी केला होता. मुंबईला रेड अलर्ट असल्याने नागरिकांना सावध राहण्याचा आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रेल्वेसेवा ठप्प – Mumbai Rain Updates
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. सायन-दादर स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने मुंबईची हि जीवनवाहिनी जाग्यावरच थांबली आहे. तर काही रेल्वेगाड्या धीम्या गतीने धावत आहेत. पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन 25 मिनिटं उशिराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे ५५ मिनिटही उशिरा धावत आहे. हार्बर लाईन वरील मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर यांसारख्या सखल भागांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल ट्रेन धीम्या गतीने धावत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी स्थानकांवर गाड्यांची वाट पाहत थांबले आहेत. Mumbai Rain Updates
मुंबई अहमदाबाद हायवे सुद्धा पाण्याखाली गेला असून या रस्त्याला नदीचे स्वरूप आलं आहे. महामार्गावरील गाड्या पाण्यातूनच प्रवास करत आहेत. खास करून दुचाकीस्वारांना मोठ्या संकटाना सामोरे जावं लागत आहे, कारण अनेक गाड्या पुराच्या पाण्यात बंद पडत आहेत, परिणामी पाण्यातूनच गाडी पुढे ढकलावी लागत आहे. हायवेवर पाणी साचल्याने वाहतूक अतिशय संथ गतीने आणि जीवावर उदार होऊन सुरु आहे. एकूणच काय तर पावसामुळे मुंबईकरांची अक्षरशः दैना उडाली आहे.




