राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना सोमवारी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या विमानतळाच्या उभारणीचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, आणि जर तो मंजूर झाला तर हे विमानतळ समुद्रात बांधले जाणारे महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरेल.
याशिवाय, अजित पवार यांनी ठाणे ते मुंबई-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मध्यवर्ती मार्गाचे उन्नतीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या शहरांना आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचा मार्ग खुला होईल.नवी मुंबई विमानतळावरील विस्ताराच्या योजनेत VVIP प्रवाशांसाठी खास टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत या टर्मिनलचे काम पूर्ण होईल, आणि हा टर्मिनल उच्चप्रोफाईल व्यक्तींंसाठी, जसे की अभिनेते, उद्योगपती आणि महत्त्वाच्या राजकीय नेत्यांसाठी बनवला जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक
सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.
याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.