हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai To Alibaugh। मुंबईवरून अलिबागला अवघ्या १० मिनिटात पोचणार असं जर तुम्हाला कोणी म्हंटल, तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. परंतु आता हे खरंच शक्य होणार आहे. कारण मुंबई- अलिबाग प्रवास अतिशय जलद आणि सुलभ करण्यासाठी एक नवा सागरी सेतू उभारला जाणार आहे. सध्या मुंबईवरून अलिबागला जायचं म्हंटल कि २ तासांहून अधिक वेळ लागतोय. मात्र एकदा का हा सागरी मार्ग सुरु झाला कि मग तुम्ही फक्त १० मिनिटात मुंबईवरून अलिबागला जाऊ शकाल.
कुठे उभारला जातोय सागरी सेतू? Mumbai To Alibaugh
खरं तर मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चरची कामे जोरात सुरु आहेत. अनेक जिल्ह्यात नवनवीन रस्ते, पूल, उड्डाणपुलाचे काम दणक्यात सुरु आहे. लोकांचा प्रवास सोप्पा, आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळेत व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे. मागील २ वर्षांपूर्वी मुंबईत अटल सेतूचे उदघाटन झालं होत. आता आणखी एक नवा सागरी सेतू मुंबईकरांना मिळणार आहे जो थेट अलिबागला जोडला जाईल. धरमतरजवळील खाडीवर रेवस- करंजा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे, ज्यामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास सोपा होणार आहे.
रेवस- करंजा पुल हा 2.04 किमी लांबीचा पूल असेल. पुढील तीन वर्षांत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला एमएसआरडीसीने 2,079 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सादर केला होता. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार त्याची किंमत 42.56 टक्क्यांनी वाढली आहे. 2.04 किमी असलेल्या या पुलामुळे अंतर 50 किमीने कमी होईल. सध्याच्या परिस्थितीत अलिबागला जाण्यासाठी मुंबईहून नवी मुंबई, पनवेल आणि पेण मार्गे अंदाजे 120 किमी रस्त्याने प्रवास करावा लागतो. परंतु रेवस आणि कारंजा दरम्यान 2.04 किलोमीटर लांबीच्या समुद्री पुलामुळे, मुंबईहून एमटीएचएल आणि नवाशेवा मार्गे अलिबागचे (Mumbai To Alibaugh) अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होणार आहे. साहजिकच यामुळे प्रवाशांच्या महत्वपूर्ण वेळेची बचत होईल. पुलाच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर रुंदीचा पादचाऱ्यांसाठीचा पदपथ देखील असेल. पुलाला जोडणारे रस्ते देखील बांधले जातील. कारंजामध्ये 5.13 किलोमीटर लांबीचा अप्रोच रोड आणि रेवसमध्ये स्टिल्टवर 1.17 किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला जाईल.




