हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी खुशखबर समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई ते कोकण अन गोवा दरम्यान जलद आणि सोयीस्कर प्रवासासाठी नवीन रो-रो (Roll-on/Roll-off) बोट सेवा सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. ही सेवा प्रवाशांना समुद्रमार्गे प्रवास करताना त्यांची खासगी वाहनेही बोटीत घेऊन जाण्याची सुविधा देणार आहे , ज्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि वेळेची बचत करणारा होईल. या सेवेमुळे प्रवाशांना फक्त साडेचार तासात कोकण गाठता येणार आहे.
मुंबई-गोवा रो-रो सेवेची घोषणा –
गणेशोत्सवाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, ज्यावेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथून मोठ्या प्रमाणावर प्रवासी कोकणच्या दिशेने प्रवास करतात, तेव्हा या सेवेचा महत्त्व विशेष ठरेल. दरवर्षी, रेल्वे आणि एसटी तिकीटांची प्रचंड मागणी आणि प्रवाशांची गर्दी यामुळे अनेकांना प्रवास करणे कठीण जाते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी मुंबई-गोवा रो-रो सेवेची घोषणा केली आहे. ही सेवा मुंबईच्या माझगाव डॉक येथून सुरू होईल, आणि प्रथम प्रवास साडेचार तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड किनाऱ्यावर पोहोचेल. पुढे, ही सेवा गोव्यापर्यंत विस्तारली जाईल, ज्यासाठी साधारण साडेसहा तासांचा वेळ लागेल.
सेवेच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू करणार –
नितेश राणे यांनी म्हटले आहे की, “ही सेवा गणेशभक्तांसाठी एक मोठा दिलासा ठरेल आणि कोकणातील प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी बनेल.” राज्य शासन लवकरच या सेवेच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू करणार आहेत . नवीन रो-रो सेवा प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल आणि कोकण व गोवा दरम्यानचे प्रवास अधिक सोयीस्कर करतील.