हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन वर्ष सुरु होण्याआधीच प्रवाशांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. आता मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प 2025 मध्ये प्रत्यक्ष सेवेत येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असून , यामध्ये प्रवासाचा कालावधी तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली आहे. तर चला जाणून घेऊयात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल अधिक माहिती.
सध्या 95% काम पूर्ण –
MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) मार्फत उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे सध्या 95% काम पूर्ण झाले आहे. याआधी डिसेंबर 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन प्रवाशांसाठी खुला होईल, असा अंदाज वर्तवला होता . पण काही तांत्रिक व नियोजनात्मक कारणांमुळे प्रकल्पाच्या पूर्णतेला उशीर होत असून आता मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रकल्पाचे उद्घाटन जून 2025 मध्ये करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
हा प्रकल्प 14 किमी लांबीचा असून , खोपोली एक्झिटपासून लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन 4 मार्गिकांचे भव्य बोगदे बांधले जात आहेत. तसेच यामध्ये पहिला बोगदा 8.87 किमी लांबीचा असून , तो भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे. दोन्ही बोगद्यांचे 98% काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे खंडाळा घाटातील केबल-स्टेड पूल हा सह्याद्री पर्वत रांगांमधून जाताना 180 मीटर उंचीचा स्टेड पुल हा प्रकल्पाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे.
प्रवासाची वेळ तब्बल 30 मिनिटांनी घटणार –
मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास लवकरच अधिक सुलभ होणार आहे. 6 किमी अंतर कमी होऊन प्रवासाची वेळ तब्बल 30 मिनिटांनी घटेल. खंडाळा घाटातील अवघड वळणांपासून सुटका होऊन हा मार्ग प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित आणि आरामदायक होईल. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे मार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येवरही मोठा प्रभाव पडेल. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प जून 2025 नंतर पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रवाशांना प्रवासाची नवी सोय अनुभवता येईल. त्यामुळे नवीन वर्ष प्रवाशांसाठी अधिक सोयी सुविधा घेऊन येणार असून , प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.