हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील. कोल्हापूरच्या राजकारणात कोणतीही निवडणूक असू द्या… उमेदवार कुणीही असलं तरी खरी लढत असते ती महाडिक आणि पाटलांच्यात. आता या सगळ्याला कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कशी चुकेल? काँग्रेसकडून शाहू छत्रपती विरुद्ध शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात खासदारकीसाठी चुरस पाहायला मिळणार असली तरी, खरी प्रतिष्ठा ही मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील (Mahadik Vs Patil) यांचीच पणाला लागणार आहे. शाहू छत्रपतींना मैदानात उतरवत सतेज पाटलांनी अर्धी लढाई जिंकत महाडिकांना मोठं आव्हान दिलं. थेट छत्रपती घराण्यातील व्यक्तीलाच तिकीट दिल्यानं त्यांना प्रचारात टॅकल कसं करायचं? हा मोठा प्रश्न महायुती सोबतच महाडिकांनाही पडलाय. मुन्ना महाडिक यांचं कोल्हापुरातील वर्चस्व मोडीत काढणाऱ्या… कारखाना, दूध संघापासून खासदारकी पर्यंतच्या निवडणुकीत बंटी पाटलांनी महाडिक यांचा कंडका पाडला…पण भाजपकडून राज्यसभेवर पुनर्वसन झालेल्या याच महाडिकांनी आता कोल्हापूर लोकसभेच्या निमित्ताने सतेज पाटलांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीय. एकेकाळी पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या एका बड्या नेत्याला बंटी पाटलांविरोधातच उभं करण्याचा महाडिकांनी घाट घातलाय. लोकसभेच्या मैदानात सध्या उजवे दिसणारे शाहू छत्रपती महाडिकांनी ही काडी टाकल्यामुळे नेमके कसे अडचणीत सापडणार आहेत? मुन्ना महाडिकांनी बंटी पाटलांच्या कोणत्या मित्राला फोडलंय? शाहूंच्या विरोधात महाडिक कसं रान उठवतायेत? हेच जाणून घेऊयात ….
महाडिक विरुद्ध पाटील या राजकारणात कोल्हापुरात झणझणीतपणा आहे. दुध असो की साखर या भोवती राजकारण फिरत असलं तरी या ठिकाणी गोडवा असेल असं म्हणण्याची सोय नाही. काट्यावर चालणारा महाडिक विरुद्ध पाटील यांच्यातला राजकीय वाद पुऱ्या जिल्ह्याला माहितेय. 2019 मध्ये खासदारकी, मग आमदारकी आणि 2021 गोकुळ महासंघाची सत्ता आणून सतेज पाटलांनी महाडिकांचा ‘कंडका पाडला…कुठं बी हुडीक मुन्ना महाडिक अशी टॅगलाईन मिरवणाऱ्या महाडिकांना या सगळ्या पराभवाची परतफेड करायची संधी चालून आलीय ती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने… काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू छत्रपतींना उमेदवारी देऊ केली. यामागचं सगळं पॉलिटिक्स कोणी जुळवून आणलं असेल तर ते बंटी पाटलांनी… शाहूंच्या प्रचारात बंटी पाटील फ्रंटला आहेत. आपली सगळी राजकीय ताकद त्यांनी पणाला लावलेली दिसतेय. शाहू छत्रपतींचा विजय म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात बंटी पाटलांचाच धाक आहे, असा मेसेज जाणार आहे…म्हणून बंटी पाटलांच्या मुसक्या आवळून महायुतीच्या संजय मंडलिकांना निवडून आणलं तर आत्तापर्यंत आपल्या झालेल्या राजकीय खच्चीकरणाचा वचपा निघेल… त्यासोबतच भाजपने आपल्याला राज्यसभेवर पाठवण्याचा जो निर्णय घेतला तो कसा सार्थ होता, ते महाडिकांना पटवून देता येईल…
याचाच एक भाग म्हणून मुन्ना महाडिक आता संजय मंडलिकांच्या प्रचारात ॲक्टिव्ह झाली असले तरी त्यांनी बंटी पाटील विरोधाची लाईन तसूभरही कमी होऊ दिले नाहीये. विशेष म्हणजे ज्या बंटी पाटलांनी हसन मुश्रीफांच्या खांद्याला खांदा लावून कोल्हापुरात काम केलं. सहकारी संस्थांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत जम बसवला. त्याच मुश्रीफांना बंटी पाटलांच्या विरोधात उभं करायला महाडिक भाग पाडतायत. पक्ष बदल झाल्यामुळे सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय मतभेद असले तरी ते आजही चांगले मित्र आहेत. पण त्यांच्यातील हे मतभेद मनभेदापर्यंत कसे जातील, यासाठी महाडिकांनी खेळी खेळायला सुरुवात केलीय. शाहू महाराजांसाठी बावड्याचे बंटी पाटील महाडिक, मंडलिक, मुश्रीफ, घाटगे या सगळ्यांना भिडतायेत. निवडणूक जिंकून कशी आणायची याचं पक्क गणित बंटी पाटलांच्या डोक्यात फिक्स असतं. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणातील बहुतांश निवडणुका या सतेज पाटलांनी एकतर्फी निवडून आणल्या आहेत. पण या सगळ्यात अनेक वेळा त्यांना समरजीत घाटगे यांच्यासोबतच हसन मुश्रीफांचीही साथ मिळाली. पाटील -मुश्रीफ या जोडगोळीने जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांना धक्के दिले. पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि मुश्रीफ महायुतीत गेले. त्यामुळे बंटी पाटील शाहू छत्रपतींचा तर मुश्रीफ संजय मंडलिक यांचा जोरदार प्रचार करतायत. याच प्रचार सभेच्या दरम्यान मुन्ना महाडिकांनी बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर ठिणगी टाकण्याचं काम केलंय.
.
मंडलिकांच्या प्रचारार्थ कागलमध्ये झालेल्या मेळाव्यात महाडिकांनी बंटी पाटलांवर टीका तर केलीच पण सोबत मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनाही पाटलांच्या विरोधात उभ केलं. महाडिक म्हणाले की, 2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापुरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा होता. मुश्रीफसाहेब महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख होते. मुश्रीफसाहेब यांना पालकमंत्री मिळू नये, म्हणून त्यांनी काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे. मुश्रीफसाहेब कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री असताना सुद्धा पालकमंत्रीपद त्यांनी मिळवले. मुश्रीफसाहेब यांना अहमदनगरला जावं लागलं. मुश्रीफ साहेबांच्या तोंडातला घास त्याने काढून घेतला. यामुळे कागलकरांनी या गोष्टीचा वचपा काढला पाहिजे… अशा शब्दात महाडिकांनी कोल्हापूरचा राजकारण तापवलंय…
थोडक्यात काय तर बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय संबंधात मिठाचा खडा टाकण्याचं काम महाडिकांकडून सुरू आहे की काय, अशी चर्चा सुरू झालीय. मुश्रीफ महायुती सोबत असले तरी त्यांचे आणि बंटी पाटलांचे संबंध लपून राहिलेले नाहीयेत. त्यामुळे मुश्रीफ आतून बंटी पाटलांना मदतीचा हात देण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच लक्षात घेऊन महाडिक त्यांच्यातील दरी जितकी मोठी होईल, तितका करण्याचा प्रयत्न करतायत. यामुळे लोकसभेला बंटी पाटील एकटे पडतील… शाहू छत्रपतींची खासदारकी धोक्यात येईल… ही अजेंड्यावरची काम मार्गी तर लागतीलच. पण पाटलांच्या मित्रांना गळाला लावून येणाऱ्या काळात जिल्ह्यातल्या दूध संघापासून ते सर्वच निवडणुकीत विरळ झालेला महाडिक ब्रँड पुन्हा एकदा वाजवण्याचा प्लॅन महाडिकांचा असू शकतो… पण त्यासाठी लोकसभेतलं नाणं खणखणीत वाजवण्याचं चॅलेंज महाडिकांना पूर्ण करावं लागेल…बॉटम लाईन अशी की, बंटी पाटलांच्या समर्थक नेत्यांना, मित्रांना फोडण्याचा डाव आता महाडिकांनी टाकलाय. 2019 मध्ये बंटी पाटलांमुळेच खासदारकीला आपला पराभव झाला, हे डोक्यात ठेवून आता याचा वचपा महाडिक 2024 ला काढू पाहतायत..आता यात त्यांना किती यश येतंय? हे येणारा काळच ठरवेल…