टीम, HELLO महाराष्ट्र । झारखंडमध्ये सध्या दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडुणक प्रचार सुरू आहे. या अनुषंगानं भाजपनं आपला प्रचाराचा जोर वाढवला आहे. राज्यात पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा झारखंड मध्ये घेण्यात येत आहेत. भाजपनं या निवडणुकीत दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये नव्यानं सामील झालेल्यांना तिकीट वाटप झालं आहे. मात्र हे तिकीट वाटप करतांना भाजपनं एका महिला शिक्षिकेच्या खुनात आरोपी असलेल्या शशिभूषण मेहता यांना उमेदवारी दिल्यानं त्यांच्यावर आता टीका होत आहे. दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांच्या सभेत हेच शशिभूषण मेहता व्यासपीठावर दिसून आल्यानं भाजपवर चौफेर टीका समाज माध्यमावर होत आहे.
शशिभूषण मेहता सध्या जामिनावर असून त्यांचा व्यासपीठावरील मोदींसोबतचा फोटो व्हायरल होऊन भाजपला नेटकऱ्यांकडून ट्रॉल केलं जात आहे. भाजपाने शशिभूषण यांना पंकी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मेहता यांच्यावर महिला शिक्षिकेच्या खुनाचा आरोप असून २०१२ मध्ये ही घटना घडली होती.
स्कुल वार्डन सुचित्रा मिश्रा यांचा खून केल्याचा आरोप मेहता यांच्यावर आहे. ध्रुवा येथी गांधी आश्रम जवळील रोड लगतच सुचित्रा यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.