सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पळशी (ता.माण) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या भांडणात कातकरी कुटुंबातील एकाची जीभ कापून व कुदळीने हल्ला करत खून झाल्याची घटना घडली. कुशा चंदर जाधव (वय- 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संशयित आरोपी बाळू गणपत जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कुशाची पत्नी मंगल जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गेल्या दोन महिन्यांपूर्वी ठेकेदार रवींद्र भगवान वाघमारे (रा. गायमाळ ता. सुधागड, जि. रायगड) यांनी कुशा व मंगल जाधव यांना पळशी येथे कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी मजुरीने आणले होते. सध्या हे दांपत्य शिंदे मळा येथे राहात होते. त्यांच्या शेजारीच नातेवाईक बाळू गणपत जाधव व त्याची पत्नी सुभद्रा ऊर्फ भवरी बाळू जाधव (मूळ रा. पवनानगर, ता. मावळ, जि. पुणे) राहतात. बाळू जाधवची पत्नी सुभद्रा ऊर्फ भवरी हिच्याशी कुशा जाधव याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुभद्रा व बाळू यांच्यात आज सकाळपासून वाद सुरू होता.
यादरम्यान कुशा जाधव हा जेवण वाढून आणलेली भांडी देण्यासाठी पळशी गावात जात असताना माण नदीच्या पात्रात बाळू व सुभद्रा यांच्यात मारहाण सुरू होती. यावेळी कुशा जाधव भांडणे सोडविण्यास गेल्यावर बाळू जाधवने पत्नीबरोबर अनैतिक संबंध आहेत, असे सांगून हातातील कुदळीने कुशा जाधव याच्या डोक्यात व इतरत्र मारहाण केली. कुशा याच्या तोंडावरही वार करण्यात आले होते, तर जीभही कापली होती. कुदळीचा घाव वर्मी बसल्याने कुशा याचा जागीच मृत्यू झाला. खुनानंतर बाळू घटनास्थळावरून पसार झाला होता.