औरंगाबाद | जाधववाडीतील व्यापारी संकुलाच्या छतावर एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना 21 मे रोजी समोर आली होती. त्यांच्या हातावर गोंदलेल्या अक्षरामुळे शनिवारी त्याची ओळख पटली दादाराव सांडू सोनवणे (45 रा. सुरेवाडी) असे मृताचे नाव आहे.ते पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता होते. जाधववाडीत मिळेल ते काम करून बाहेरच राहत होते. त्यांचा खून तेथील नशेखोरांनी दारू,नशेच्या वादातून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
दादाराव यांचा चेहरा पूर्णपणे ठेचल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. बाजूला कपड्यांची पिशवी सापडल्याने ते बाहेरून आले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सिडको पोलिसांनी त्यांचे वर्णन प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी पहाटे त्यांची ओळख पटली. त्यांचे कुटुंबीय नातेवाईक घाटीत दाखल झाले. दुपारनंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.
मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. दादाराव पहिले टेलरिंगचे काम करत होते. नंतर त्यांनी ते काम सोडले, रागीट स्वभाव असल्याने वाद घालून घर सोडून जायचे व सतत नशेत जाधववाडीतच राहत होते. तिथे मिळेल ते काम करायचे. तेथील मजूर, कामगारांसोबत राहायचे त्यातून त्यांचा संपर्क नशेखोरासोबत आला असावा. दारूच्या वादातूनच त्यांचा खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्यांच्या पश्चात पत्नी, बारावीचे शिक्षण घेत असलेली मुलगी व चोवीस वर्षाचा मुलगा आहे. मुलगा शिक्षणासोबतच नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो असे, गिरी यांनी सांगितले.