औरंगाबाद | चुलत भावाच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी गुंड विकास फाटे याचा शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या घटनेनंतर फरार झालेल्या आठ पैकी तीन आरोपींना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पाटोदा शिवारातून जेरबंद केले आहे.
वडगाव कोल्हाटी येथील कुख्यात गुंड विशाल ऊर्फ मद्या किशोर फाटे हा तीन साथीदारांना सोबत घेऊन, शुक्रवारी रात्री बाजाजनगरात मृगनयनी हॉटेलमध्ये ओल्या पार्टीसाठी गेला होता. त्याच वेळी विरोधी गँगचे अजय प्रधान व त्याचे साथीदारही तेथे पार्टीसाठी गेले. दोन्ही गँगचे सदस्य समोरासमोर आल्याने जुन्या भांडणावरून वाद उफाळला, या वादानंतर हॉटेलमध्ये झोंबाझोंबी करीत अजय प्रधान व त्याच्या साथीदारांनी विशालला हॉटेलमधून बाहेर रस्त्यावर आणले, तेव्हा विशालचे तिन्ही साथीदार पळून गेले.
यानंतर विशालला सचिन प्रधान,अजय प्रधान,सतीश काळे व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली. यावेळी जिवाच्या आकांताने तो पळून जात असताना, अजय प्रधान व त्याच्या साथीदाराने विशालच्या डोक्यात दगड मारला. यात विशाल गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच निपचित पडला. यानंतर सचिन प्रधान व त्याचे साथीदार एका पांढऱ्या रंगाच्या कारने फरार झाले होते. ते पाटोदा गावातील नातेवाईकाकडे जाणार असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी शनिवारी पाटोदा चौफुलीवर सापळा रचला. आणि आरोपी सचिन प्रधान, अजय प्रधान, सतीश काळे यांना जेरबंद केले. या प्रकरणातील नामदेव प्रधान, दर्शन चौधरी यांच्यासह तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.