हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आज महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) कडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडो मारो आंदोलन (MVA Jodo Maro Aandolan) करण्यात आलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन पार पडलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
खरं तर महाविकास आघडीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र तरीही कोणतीही पर्वा न करता महाविकास आघाडीने हे आंदोलन केलं. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हा मोर्चा पार पडला. शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज हे काही वेळ मोर्चामध्ये चालले. त्यानंतर गाडीतून हे दोघे गेट वे ऑफ इंडियाकडे रवाना झाले. गेट वे ऑफ इंडिया परिसरात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत या भव्य दिव्य मोर्चाची सांगता झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करताना सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवरायांचा पण गद्दार म्हणेन. आता याना गेट आऊट ऑफ इंडिया असं म्हणायची वेळ आली असं ठाकरेंनी म्हंटल.
दुसरीकडे शरद पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचयवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे असा थेट आरोप शरद पवार यांनी केला.