माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे त्यामुळं माफी मागणार नाही;राहुल गांधींनी केला भाजपवर पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी देशात भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याचे सांगत मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. हे करत असताना राहुल यांनी भाजपसाठी लोकप्रिय असलेल्या मेक इन इंडिया या घोषणेचा विपर्यास करत ‘रेप इन इंडिया’ असं म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयन्त केला होता. तेव्हा राहुल गांधी यांनी आपल्या वादग्रस्त विधानावर संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपने करत राजकारण तापवलं असताना. राहुल यांनी भाजपवर पलटवार केला आहे. “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान राहुल यांनी हे विधान केलं.

आपल म्हणणं अधिक स्पष्टपणे मांडत राहुल गांधी म्हणाले, “काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा. मात्र, जे खरं आहे त्यासाठी माझ्याकडून माफी मागितली जात होती. माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.”

 

आपल्या भाषणात राहुल यांनी वर्तमान सरकारच्या आर्थिक धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. देशाची आर्थिक स्थिती घसरण्यामागे मोदी सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय तसेच देशाचे पंतप्रधान मोदी कसे जबाबदार आहेत हे सांगितले. पी. चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी मोदींना सांगितल होतं की तुम्ही जीएसटी लागू करु नका. मात्र, त्यांचं काहीही न ऐकता त्यांनी म्हटलं की रात्री १२ वाजताही मी हा जीएसटी लागू करुनच दाखवणार. मात्र, त्याचा परिणाम काय झाला ९ टक्क्यांवरील जीडीपी ४ टक्क्यांवर आला. यांनी जीडीपी मोजण्याची पद्धतही बदलून टाकली आहे, जुन्या पद्धतीने जर जीडीपी मोजला तर तर देशाची अर्थव्यवस्था आज अडीच टक्केच राहिली आहे. देशाच्या सर्व शत्रूंना वाटत होते की, भारताची अर्थव्यवस्था संपावी. त्यानुसार, आज आपली अर्थव्यवस्था संपली आहे मात्र हे काम त्यांनी केलेलं नाही तर आपल्याच पंतप्रधानांनी केलं आहे. तरीही ते स्वतःला देशभक्त म्हणवून घेत आहेत, अशा कडव्या शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.

यावेळी राहुल गांधी यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. राहुल म्हणाले, ‘कामगार आणि शेतकऱ्यांप्रमाणे इमानदार उद्योगपतींचाही देशाच्या जडणघडणीत वाटा असतो हे मला मान्य आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात मोदींनी अडाणीला १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची ५० कंत्राटं दिली. देशाचे विमानतळ, बंदरांची काम दिली. याला आपण चोरी किंवा भ्रष्टाचार म्हणणार नाही का?’ असे ते यावेळी म्हणाले.

Leave a Comment