Wednesday, October 5, 2022

Buy now

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली- वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच असुन परत आज रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावांत देखील आवाज आले आहेत.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात मागच्या अनेक वर्षांपासून भूगर्भातून आवाज येत आहे. या आवाजाने शतक पार केले आहे. दोन ते तीन वेळा हा आवाज आल्याने सौम्य भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद देखील झाली आहे. तसेच सतत होणाऱ्या आवाजाची पाहणी स्वारातीम विद्यापीठ येथील भूगर्भ तज्ज्ञांनी देखील केली आहे. मात्र आवाजाचे गूढ अद्याप उकलले नाही. पांगरा शिंदे गावात आवाज आल्यावर आजुबाजुला असणाऱ्या गावात देखील हे आवाज येत आहेत. तसेच वसमत तालुक्यासह कळमनुरी व वसमत तालुक्यातील काही गावात हे आवाज येत आहेत. आतापर्यंत या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही मात्र गावकरी भयभीत होत आहेत.

दरम्यान रविवारी सकाळी ५.४७ वाजता भूगर्भातून मोठा आवाज आला. त्यानंतर लागलीच दुसरा आवाज आला. या आवाजाची तीव्रता कमी होती. पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, खांबाळा, खापरखेडा, सिरळी, राजवाडी आदी गावात हा आवाज आल्याचे गावकरी सांगत आहेत. तसेच कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, हारवाडी, नांदापुर तसेच औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसरात देखील आवाज आला आहे. दरम्यान, येथे सतत होणाऱ्या आवाजाचे गूढ उकलावे अशी मागणी या गावातील गावकरी प्रशासनाकडे सातत्याने करीत आहेत. येथे रात्री बेरात्री होणाऱ्या आवाजाच्या मालिकेने गावकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे. गावात अचानक असा आवाज आल्यावर गावकरी रस्त्यावर येऊन गावात कोठे काही घडले का याची माहिती घेतात त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.