औरंगाबाद – राज्यभरात गाजत असलेल्या डॉ. राजन शिंदे खून प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. हा खून करण्यासाठी आरोपीने वापरलेली शस्त्रे अखेर पोलिसांच्या हाती लागली आहेत. ही शस्त्रे आरोपीने जवळच्याच विहिरीत टाकल्याचे सांगितले होते. मात्र या विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ, कचरा पाणी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ही विहीर उपसण्याचे काम पोलिसांकडून सुरु होते. आता ही शस्त्रे सापडल्यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.
आज तब्बल 7 दिवसांनी पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने एका विहिरीतून डंबेल्स, चाकू व रक्त साफ करण्यासाठी वापरलेला टॉवेल हस्तगत करण्यात आला. या डंबेल्सने प्रा. शिंदे यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. हा वार केल्यानंतर प्रा. शिंदे हे बेशुद्ध पडले. त्यानंतर त्याच्या हाताच्या नसा कापण्यात आल्या. अतिशय नियोजन करून हा खून करण्यात आला. प्रा. राजन शिंदे हे अतिशय शिस्तप्रिय होते. याचा त्यांच्या मुलाला राग यायचा. यात टोकाचा वाद होऊन मुलाने त्यांच्या खूनाचा कट रचला. यासाठी त्या मुलाने इंटरनेटचा आधार घेतला. याशिवाय काही वेबसिरिजही पाहिल्या. विविध सोशल मीडिया, यू ट्यूबवरही त्याने सर्चिंग करून या खूनाचा कट रचला व त्यानुसार खून केला.
जवळपास आठवडा उलटूनही या खूनाचा मारेकरी सापडत नसल्यामुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढत होते. घरातील व्यक्तीनेच हा खून केला असावा, असा तर्कशुद्ध अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र पुराव्याअभावी पोलिस कारवाई करत नव्हते. मात्र, पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी रात्रीचा दिवस करून अखेर खूनासाठी वापरलेली डंबेल्स, चाकू व रक्त साफ करण्यासाठी वापरलेला टॉवेल विहिरीतून हस्तगत करण्यात आला आहे. आज सकाळपासून पोलिस त्या विहिरीतून हे पुरावे हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत होते. विहिरीतील पाणीउपसा करून ही शस्त्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इंटरनेटचा अतिरेक, बेबसिरीजचा भडीमार यामुळे मुले रागीट होऊन असा टोकाचा हल्ला करू शकतात, हा विषय आता ऐरणीवर आला आहे. त्यासाठी मुलांना मोबाईलचा अतिरेक व इंटरनेटचा दुरुपयोग टाळण्यासाठी पालकांनी अतिशय खबरदारी घेण्याची वेळ आता आली आहे.