नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आरोपी तरुणाने बतावणी करून कारमध्ये २७वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने प्रसंगावधान राखत युवकाला लाथ मारून स्वत:ची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला. हि घटना एमआयडीसी परिसरात घडली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सोनू नावाच्या युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरुणी हि ‘होम पेंशट केअर टेकर’ चे काम करते. रविवारी सकाळी सोनू नावाच्या व्यक्तीने या तरुणीला मोबाईलवरून संपर्क साधला. ‘माझ्या वडिलांनी तुम्हाला बोलाविले आहे. मी तुम्हाला घ्यायला येतो’ असे सोनुने पीडित तरुणीला सांगितले. त्यानंतर सोनू सकाळी ९ वाजता तरुणीच्या घरी गेला. त्यानंतर ते दोघे कारने जात असताना त्याने कार मध्येच थांबवून कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
तेव्हा तरुणीने आरडा-ओरड करण्यास सुरुवात केली पण तिला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. यानंतर त्या तरुणीने प्रसंगावधान राखत सोनूच्या पोटावर लाथ मारली. कारमधून बाहेर उतरली व जीव मुठीत घेऊन पळायला लागली. यानंतर सोनूने तिचा पाठलाग करत तिला याबाबत कुठे सांगितले तर ठार मारेन अशी धमकीदेखील दिली व कार घेऊन फरार झाला. याबाबत तरुणीने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस सोनूचा शोध घेत आहेत.