हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Liquor Factory । महाराष्ट्र सरकार हे आपल्या राज्यात सतत नवनवीन प्रकल्प आणण्यावर भर देत असते. औद्योगिक प्रकल्प, इलेकट्रॉनिक प्रोजेक्ट, माहिती तंत्रज्ञान प्रोजेक्ट किंवा संरक्षण क्षेत्रातील प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातील काही शहरात तर आहेच, परंतु आता राज्यातील एका बड्या शहरात आशिया खंडातील सर्वात मोठी दारूची फॅक्टरी उभारण्यात येणार आहे. हे शहर म्हणजे दुसरं तिसरं कोणतं नसून राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेले नागपूर आहे.
मद्य निर्मिती क्षेत्रातील आघाडीची फ्रेंच कंपनी पर्नोड रिकार्ड इंडिया ही नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात आशिया खंडातील सर्वात मोठा माल्ट स्पिरिट डिस्टिलरी व मॅच्युरेशन प्लांट (Nagpur Liquor Factory) उभारणार आहे .खरे तर गेल्या वर्षी सीएम फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा सामंजस्य करार झाला होता.आता हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यावरण विभाग, राज्य उत्पादन शुक्ल विभागत तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
1800 कोटी रुपयांचा प्रकल्प – Nagpur Liquor Factory
हा दारू प्रकल्प तब्बल 1800 कोटी रुपयांचा आहे. नागपूरमध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर दररोज ६० हजार लिटर माल्ट स्पिरिटची निर्मिती होणार आहे. यातून वर्षाला १३ लाख दशलक्ष लिटर उत्पादन क्षमतेचा टप्पा गाठला जाईल. नागपूर मधील या सर्वात मोठ्या मद्य प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे स्पिरीट तयार करण्यासाठी कच्चामाल म्हणून जव लागणार आहे. दरवर्षी सुमारे 50 हजार टन जव या प्रकल्पासाठी लागेल. विशेष म्हणजे हा कच्चामाल स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार आहे.
एकीकडे मागच्या काही महिन्यात नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या एमडी तस्करीच्या विरोधात भाजपचे नेते सातत्याने विधानसभेत आवाज उठवत आहेत. विदर्भाला उडता पंजाब होऊ देऊ नका अशी मागणी केली जात आहे. असं असतानाही आशिया खंडातील सर्वात मोठी दारूचे उत्पादन करणारी फॅक्टरी याच नागपुरात उभारण्यात येणार असल्याने विरोधकांना भाजप विरोधी आयते कोलीत सापडलं आहे. या दारू फॅक्टरी मुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.




