सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
साताऱ्यात महाबळेश्वर तालुक्यात 22 आणि 23 जुलै रोजी पावसाने हाहाकार केला होता. यामध्ये अनेक गावांवर अस्मानी संकट कोसळले होते. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांचे भुसखलन होऊन मोठे अर्थिक नुकसान झाले होते. ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराचे आणि शेतीचे अतोनात नुकसान झाले होता. या नुकसानग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सपाटीकरण आणि डागडुजी करण्याचा संपूर्ण खर्च ‘नाम’ फाउंडेशनने उचला आहे. पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि गावातील वाहून गेलेल्या रस्त्यांसाठी नाम फौंडेशनने 105 गावांसाठी जेसीबी आणि पोकलेंन देऊन मदतीचा हात दिला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कोयना, सोळशी, कांदाटी, बामणोलीसह यांसह अनेक गावांचे अतोनात नुकसान झाले होते.
105 गाव व्यवस्थापन समिती आणि नाम फाउंडेशनच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि गावालगत असलेले ओढे, नदीपात्रे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासाठी नाम फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. अतिवृष्टीने मारलं आणि नाम फौंडेशनने तारले असे सांगत गावकऱ्यांनी नाम फौंडेशनचे आभार मानले आहेत.
दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्यात उर्जित अवस्था आणण्यासाठी नाम कडून मदत केली जाणार आहे. या वाहनांना स्थानिक समाजिक संस्था व व्यक्तीकडून इंधन पुरवठा केला जाणार आहे. वाघाळे, उचाटे येथे आज कामांचा शुभारंभ करण्यात आला.